अलिबाग (प्रतिनिधी): गेल्या तीन वर्षांपासून नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिहू, बेणसे, मुंढाणी आणि झोतीरपाडा या गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या एका सराईत घरफोड्याला अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऑनलाईन रम्मी जुगारात झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा तरुण घरफोड्या करत असल्याची कबुली त्याने दिली आहे.
नागोठणे परिसरात रात्रीच्या वेळी घरे बंद असल्याची भनक लागताच हा चोरटा डल्ला मारत असे. विशेषतः गावातील नागरिक भजन, हरिपाठ किंवा सप्ताहासाठी काही वेळासाठी घराबाहेर पडले, की ही संधी साधून तो घरफोडी करत असे. चोरीची पद्धत अत्यंत सराईत असल्याने चोर हा स्थानिकच असावा, असा संशय बळावला होता. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वाढत्या घरफोड्यांमुळे स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, ज्यामुळे काही काळ चोऱ्या थांबल्या होत्या. मात्र, काही महिन्यांनंतर जिथे सीसीटीव्ही नाहीत, अशा गावांना चोरट्याने पुन्हा लक्ष्य केले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी गुन्हे शाखेला तातडीने तपास करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांमार्फत तपास सुरू केला. तपासादरम्यान आदित्य अमृत कुथे (वय २३, रा. मुंढाणी) याच्यावर संशय बळावला. तो कंत्राटी कामगार असूनही त्याचे महागडे मोबाईल, गाड्यांचे शौकीन असणे आणि त्याचे उत्पन्न यांचा मेळ लागत नव्हता. त्याच्या बँक स्टेटमेंटची तपासणी केली असता, तो ऑनलाईन रम्मीमध्ये मोठे पैसे हरत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आदित्य कुथे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने नागोठणे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. ऑनलाईन रम्मीच्या नादामुळे डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठीच आपण चोऱ्या करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सपोनि मानसिंग पाटील, हवालदार अमोल हंबीर, पोलिस शिपाई ईश्वर लांबोटे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. आरोपीला पुढील कारवाईसाठी नागोठणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
