उरण । अनंत नारंगीकर
उरणच्या पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागवणाऱ्या पुनाडे धरणाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि. १८) आमदार महेश बालदी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी विशेष दौरा केला. या पाहणी दरम्यान धरणाची गळती, गाळाची समस्या आणि जलजीवन मिशनच्या कामांतील दिरंगाई समोर आल्याने लोकप्रतिनिधींनी उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
पुनाडे धरणाची निर्मिती मुळात पाझर तलाव म्हणून करण्यात आली होती, परंतु परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून आठ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, धरणाला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जर ही गळती थांबली तर संपूर्ण उरण तालुक्याला या धरणातून पाणीपुरवठा होऊ शकतो, ही बाब आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आली. यावर तातडीने उपाययोजना म्हणून गळती रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचे बांधकाम करण्याबाबतचे इस्टिमेट तयार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दौऱ्यादरम्यान ‘आठ गाव पाणीपुरवठा कमिटी’ने गावांना होणारा पाणीपुरवठा गढूळ असल्याचे लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाईपलाईन टाकणे, सोलर यंत्रणा बसवणे आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती ही कामे अत्यंत संथ गतीने आणि अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून आले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी संबंधित कामांची ‘थर्ड पार्टी’ चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. कामात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, उपनगराध्यक्ष रवी भोईर, भाजपा ग्रामीण मंडळ अधिकारी धनेश गावंड, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, आठ गाव पाणीपुरवठा अध्यक्षा अनामिका म्हात्रे, कृष्णा पाटील, देवेंद्र पाटील, सारडे सरपंच रोशन पाटील, उरण गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, जलजीवन मिशनचे अधिकारी प्रशांत पांढरपट्टे, उपअभियंता रूपाली म्हात्रे, विस्तार अधिकारी विनोद मिंडे आणि जलसंपदा अधिकारी पारडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
