• Mon. Apr 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघी पोर्ट व औद्योगिक प्रकल्पांमुळे जमीन व्यवहारांना वेग; पर्यावरणाच्या हानीबाबत नागरिकांतून चिंता व्यक्त

ByEditor

Apr 20, 2026

वैभव कळस (म्हसळा) : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील दिघी परिसरात मुंबई कॉरिडॉरलगत विकसित होत असलेले ‘दिघी पोर्ट’ आणि तुरुंबाडी येथील ‘दास ऑफशोअर’ कंपनीचा जहाज बांधणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठी चालना मिळाली आहे. मात्र, या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने स्थानिकांकडून संताप व चिंता व्यक्त केली जात आहे.

आर्थिक उलाढालीत वाढ, गुंतवणुकीचा ओघ

परिसरात औद्योगिक हालचाली वाढल्याने आणि श्रीवर्धन, हरिहरेश्वर तसेच दिवेआगर या पर्यटनस्थळांच्या लोकप्रियतेमुळे श्रीवर्धन तालुक्याचे महत्त्व वाढले आहे. यामुळे या भागात अनेक लघु व मध्यम उद्योग तसेच व्यावसायिक प्रकल्प उभे राहू लागले आहेत. गुंतवणूकदारांचा ओघ वाढल्याने जमिनींच्या किमतीत मोठी वाढ झाली असून मागणीही लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे चित्र दिसत आहे.

निसर्ग संपदेवर कुऱ्हाड?

विकासाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. अनेक ठिकाणी हमरस्त्यालगत डोंगर कापले जात आहेत, तर समुद्र खाडीच्या भागात अनधिकृत भराव टाकण्याचे काम जोमाने सुरू आहे. निसर्गाचे हे उत्खनन आणि खाडी क्षेत्रातील अतिक्रमण यामुळे भविष्यात मोठी पर्यावरणीय आपत्ती ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ कागदोपत्री विकास न होता निसर्गाचा ऱ्हास थांबवण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.

रोजगाराच्या संधींची प्रतीक्षा

स्थानिक नागरिकांच्या मते, केवळ जमिनींचे व्यवहार आणि बांधकामे होऊन परिसराचा खरा विकास होणार नाही. या भागात प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय आणि कारखाने उभारले गेले पाहिजेत. “जर येथे मोठे प्रकल्प उभे राहिले, तरच हजारो भूमिपुत्र तरुणांना रोजगार मिळेल आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल,” अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.

शाश्वत विकासाची गरज

औद्योगिकीकरणामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईलच, पण त्यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि पारंपारिक शेती-बागायती क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळणे आवश्यक आहे. एकूणच, विकास आणि पर्यावरण यामध्ये योग्य समतोल राखून स्थानिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!