माणगाव | सलीम शेख
माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे एका लॉजिंगमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपी सध्या फरार आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या लोणेरे येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजिंगमध्ये ही घटना घडली. सोमवारी, २० एप्रिल रोजी रूम नंबर १०१ मध्ये हॉटेलचा सफाई कामगार साफसफाईसाठी गेला होता. त्याने वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने लॉजिंग चालकाने तातडीने गोरेगाव पोलीस ठाण्याला पाचारण केले.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडवर एक तरुणी ब्लँकेट ओढलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी ब्लँकेट बाजूला केले असता, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. मृत तरुणीचे वय अंदाजे २२ वर्षे असून, पल्लवी मोरे अस हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. ती माणगाव तालुक्यातील वडगाव बौद्धवाडी येथील राहणारी आहे. अज्ञात आरोपीने हत्या केल्यानंतर पलायन केले. आरोपी तरुण हा रत्नागिरी मधील असून त्याला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय.
ह्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि लॉजिंगमधील नोंदणी वहीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोणेरे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
