कु. अम्मारा अकलेकर ९१ टक्के गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम
माणगाव | सलीम शेख
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. 8 मे २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या युनायटेड इंग्लिश स्कुल मोर्बा शाळेने सलग दुसऱ्या वर्षी दहावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करताना या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल १०० टक्के इतका लागला असून कु. अम्मारा म. हनीफ अकलेकर या विद्यार्थिनीने ९१ टक्के इतके गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.
या शाळेमधून कु. अनया राहील गंगरेकर या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के इतके गुण संपादन करून द्वितीय क्रमांक तर कु. महीन समीर गंगरेकर या विद्यार्थिनीने ८९.६० टक्के इतके गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी बसले होते हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा सलग दुसऱ्या वर्षी दहावीचा निकाल नेत्रदीपक लागल्याने पालकवर्गांमधे तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.
भविष्यात हि शाळा आणखी नावारूपाला येईल अशी आशा मोर्बा विभागातील नागरिकांनी बोलून दाखविली आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याने संस्था पदाधिकारी यांनी शिक्षकांचे खास अभिनंदन करून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहील गंगरेकर, सेक्रेटरी आमीन धनसे, खजिनदार समीर गंगरेकर, सदस्य नासिर डावरे, सदस्य आमीर डावरे, डॉ. फैसल, मुख्याध्यापक झोया बडे, उपमुख्याध्यापक नुसरत जालगावकर, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
