माणगाव | सलीम शेख
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल, माणगाव यांनी सन २०२५-२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व संपूर्ण माणगाव परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि विशेष म्हणजे सर्व ४१ विद्यार्थी यशस्वी ठरले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा याच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हीच खरी पावती मानली जात आहे. निकालाच्या गुणवत्तेचा विचार करता ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ३ विद्यार्थी, ८० ते ९० टक्के गुण मिळविणारे ८ विद्यार्थी, ७० ते ८० टक्के गुण मिळविणारे १० विद्यार्थी, ६० ते ७० टक्के गुण मिळविणारे ९ विद्यार्थी, ५० ते ६० टक्के गुण मिळविणारे ७ विद्यार्थी तर ४० ते ५० टक्के गुण मिळविणारे ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या निकालातून विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती आणि शाळेची शैक्षणिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष चमकदार कामगिरी केली. कायापक तन्वी धम्मपाल हिने ९४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विश्वकर्मा प्रतिभा भानुप्रसाद हिने ९४.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. पलकर निधी रामदास हिने ९०.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत शाळेचा मान उंचावला. तसेच अडे आरती कपिल (८७.६०%), वाडेहवाळ भरगव भारत (८६.६०%), कोळेकर राजवर्धन रावसाहेब (८५.४०%), भोंकर आयुष निलकंठ (८४.६०%), वैकुळ पार्थवी गुरुप्रसाद (८३.४०%), परमार पार्थ प्रकाश (८२.८०%) आणि पोटाळे पार्थ सुरेश (८२.६०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवंत परंपरेत भर घातली.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले विशेष परिश्रम आणि विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द, अतिरिक्त तासिका घेणे आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे, समुपदेशन यामुळेच हा अभिमानास्पद निकाल शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शाळेच्या या यशस्वी निकालामुळे माणगावच्या शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव आदराने घेतले जात असून, आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
