मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरी गावामध्ये बहिणीला मारहाण का केली हे विचारण्यास गेलेल्या दोघांना मारहाण झाली. या मारहाणीमध्ये दोघेजण जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या विरोधात महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील पिंपळदरी गावामध्ये राहणाऱ्या सुरज अशोक शेटे (वय २६) हा त्याच्या पत्नीला मारहाण, शिवीगाळ करत असतो. त्यामुळे त्याचा मेव्हणा अनिकेत अशोक तारे (वय 26) आणि त्याची आई शैला अशोक तारे (वय 48) हे दोघेजण त्याला जाब विचारण्यास पिंपळदरी येथे गेले होते. बहिण संजना हिला मारहाण का केली याचा जाब विचारला असता सागर अशोक शेटे याने अनिकेत अशोक तारे याच्या डोक्यामध्ये कोणत्यातरी हत्याराने दुखापत केली आणि सुरज अशोक शेटे आणि सागर शेटे या दोघांनी अनिकेत तारे आणि शैला तारे या दोघांना घराबाहेर काढून मारहाण केली.
याबाबत महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये अनिकेत अशोक तारे यांनी खबर दिली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून याप्रकरणी भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सी. आर. अंबरगे हे करत आहेत.
