• Wed. May 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीत कोट्यवधींचा अपव्यय; निकृष्ट कामांमुळे ‘बळीराजा फाउंडेशन’ आक्रमक

ByEditor

May 27, 2026

धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजव्या आणि डाव्या तीर कालव्यावर आठ-दहा वर्षांपूर्वी झालेल्या लायनिंग मास काँक्रिटीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराची आता पुनरावृत्ती होताना दिसत आहे. आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. या भ्रष्ट कारभाराविरोधात ‘बळीराजा फाउंडेशन’ने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, यामुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे.

रोह्यातील शेतकरी वर्गासाठी कार्यरत असलेल्या बळीराजा फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाणी आंदोलनानंतर तब्बल १० ते १२ वर्षे रखडलेल्या कालव्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली होती. या दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, गेल्या २-३ वर्षांत झालेल्या कामांमध्ये अनेक एस्कॅप, सायपन आणि लायनिंग काँक्रीटची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे समोर आले आहे.

वर्षभरातच काँक्रीट उखडले; कामाला लागला ‘चुना’

सध्या कालव्याचे बहुतांश एस्कॅप लिकेज (गळती) झाले असून, ठेकेदारांनी कामाला निव्वळ ‘चुना’ लावल्याचे विदारक चित्र आहे. पाले खुर्द गावानजीक मागील वर्षी केलेले लायनिंग मास काँक्रीट दुसऱ्याच वर्षी पूर्णतः उखडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे काम एका बाहेरील ‘पाटील’ नावाच्या ठेकेदाराने केल्याचे सांगण्यात येत आहे. कालव्याच्या लायनिंगला मोठ्या भेगा पडल्या असून इतर ठिकाणचे काँक्रीटही निकामी होण्याच्या मार्गावर आहे.

असे असतानाही पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्याच ठेकेदारांवर मेहेरबान का? त्यांच्या पाठीशी नेमका कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

अधिकारी ठरताहेत ‘कठपुतळी’

कोलाड पाटबंधारे विभागातील विविध कामांचे वाटप विशिष्ट राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्यांच्याच कार्यकर्त्यांना (फंटर्स) केले जात असल्याची चर्चा सर्वश्रुत आहे. या प्रक्रियेत वरिष्ठ अधिकारी केवळ ‘कठपुतळी’ बनून काम करत असल्यामुळेच कामांची पुरती वाट लागली आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही पाणी सोडण्याचे कोणतेही ठोस नियोजन नाही आणि अधिकाऱ्यांमध्ये कसलाही समन्वय नाही, अशी परिस्थिती आहे.

…तर गाशा गुंडाळावा लागेल; बळीराजा फाउंडेशनचा इशारा

“कालवा दुरुस्तीच्या कामात झालेल्या निधीच्या अपव्ययाची आणि बिले प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित दोषी ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाकावे, अन्यथा बळीराजा फाउंडेशन प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल.” — विठ्ठल मोरे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन

“शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे. या संपूर्ण कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशी आमची कायदेशीर मागणी राहणार आहे.” — अ‍ॅड. दीपक भगत, सचिव, बळीराजा फाउंडेशन

शेतकऱ्यांची मुख्य मागणी:

सध्या आंबेवाडी आणि संभे भागातील कालवे मोठ्या प्रमाणावर लिकेज असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे:

  • कालव्याची दुरुस्तीची कामे मुदतीत आणि दर्जेदार पूर्ण करावीत.
  • पुढील हंगामात कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना पूर्ववत आणि सुरळीत मिळावे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!