• Thu. May 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव हादरले! १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; मृतदेह जंगलात फेकला

ByEditor

May 28, 2026

माणगाव । सलीम शेख
एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण माणगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली अन् घात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारे उतेकर कुटुंब उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी या आपल्या गावी आले होते. या कुटुंबातील निधी राकेश उतेकर (वय १५ वर्ष) ही मुलगी सोमवार, २५ मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ झाला तरी ती परतलीच नाही. कुटुंबाने सोमवार रात्रीपासूनच तिचा सर्वत्र शोध सुरू केला होता, पण ती सापडली नाही.

दोन दिवसांनी जंगलात सापडला मृतदेह

बुधवार, २७ मे रोजी घरोशीवाडीच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी निधीच्या वडिलांना घटनास्थळी बोलावले असता, तो मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले. निधी ही विलेपार्ले येथील ‘सेंट जेव्हियर्स’ शाळेत शिकत असून नुकतीच ती इयत्ता ९ वी उत्तीर्ण झाली होती. सुट्टी घालवण्यासाठी ८ दिवसांपूर्वीच ती आई, वडील आणि भावासोबत गावी आली होती.

निधीचा मृतदेह जंगलातील एका निर्जन ठिकाणी आढळून आला. तिच्या अंगावरील जखमा पाहता तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम (न्यायवैद्यक पथक) आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सध्या निधीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि अधिक तपशील समोर येईल. याप्रकरणी माणगाव पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!