अलिबाग । अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा कणा मानले जाणारे हे कर्मचारीच आता स्वतः आर्थिक अडचणीत सापडल्याचे विदारक चित्र आहे. सलग तिसरा महिना संपत आला असतानाही हक्काचे वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेतनाअभावी अनेक कर्मचाऱ्यांचे मासिक आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. घरखर्च चालवणे, मुलांच्या शाळा-कॉलेजचे शुल्क भरणे, बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे, वीजबिले आणि इतर दैनंदिन वैद्यकीय खर्च भागवताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. नियमित पगार होत नसल्याने काही कर्मचाऱ्यांवर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मित्र, नातेवाईक किंवा इतरांकडून कर्ज आणि आर्थिक मदत मागण्याची नामुष्की ओढावली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले हे कर्मचारी ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची तळागाळातील नागरिकांपर्यंत अंमलबजावणी करणे, रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे आणि वैद्यकीय कामकाजात सातत्य ठेवण्याचे काम हे कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. मात्र, अहोरात्र जनतेची सेवा करत असताना स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक समस्यांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमधील संताप वाढतो आहे.
दरम्यान, या रखडलेल्या वेतनासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील यांनी तांत्रिक बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, काही अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे तसेच वेतन वितरणासाठी नवीन प्रणाली (सिस्टम) लागू करण्यात आल्यामुळे प्रक्रियेत हा विलंब झाला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन येत्या सोमवारपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या आश्वासनामुळे अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण न होता वेतन वितरण प्रक्रिया दरमहा नियमित आणि वेळेत व्हावी, अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
