• Thu. Jun 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये खळबळ: बेकायदेशीर मातीच्या ढिगाऱ्यात सापडली मानवी कवटी!

ByEditor

Jun 4, 2026

माफियांच्या उत्खननामागे मोठ्या गुन्हेगारी रॅकेटचा संशय; पोलीस व महसूल प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर जनतेचा तीव्र संताप

उरण | विठ्ठल ममताबादे
एका बाजूला निसर्गाचा संहार करत डोंगर पोखरले जात असतानाच, आता उरण तालुक्यातील जासई येथे चक्क मानवी अवशेष सापडल्याने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. जासई येथील दादरपाडा बस स्थानकासमोरील एका बिअर शॉपजवळ टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात मानवी कवटी आढळून आली आहे. या भयानक प्रकारामुळे बेकायदेशीर माती उपशाच्या मागे एखादे मोठे गुन्हेगारी रॅकेट किंवा हत्याकांडाचे रहस्य दडले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

डोंगरांची झाली ‘चाळण’; निसर्गाच्या बाजारात माणुसकी गायब

जासई आणि परिसरात सध्या कायद्याचे नियम धाब्यावर बसवून ‘माती खोदा आणि पैसे कमवा’ हा एकच अजेंडा माफियांकडून राबवला जात आहे. स्थानिक माती माफियांनी जासई परिसरातील डोंगरांची अशी काही चाळण केली आहे की, आता या डोंगरांना ‘खड्डा योजना’ म्हणण्याची वेळ आली आहे. निसर्गाचे आणि शेतजमिनींचे कंबरडे मोडून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायातून माणुसकी पुरती गाडली गेली आहे. निसर्गाच्या या ‘पोस्टमॉर्टम’च्या बाजारात आता चक्क माणसांची हाडे आणि कवटी बाहेर येऊ लागल्याने परिसरात कमालीची घबराट पसरली आहे.

“भर वस्तीत आणि रस्त्याच्या कडेला मातीच्या भरावात माणसाची कवटी सापडते, पण प्रशासनाची ‘कवटी’ का हलत नाही?” : नागरिकांचा संतप्त सवाल

प्रशासनाला ‘प्रसादा’ची बाधा? अधिकारी गप्प का?

धक्कादायक बाब म्हणजे भर वस्तीत मानवी शरीराचा भाग सापडूनही स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासन कमालीचे शांत आहे. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, अधिकारी मात्र कोणतीही ठोस हालचाल करायला तयार नाहीत. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जासई परिसरातून दररोज रात्रं-दिवस हजारो डंपर माती चोरून नेली जाते. या अवैध वाहतुकीला राजाश्रय मिळण्यासाठी प्रति डंपर ‘प्रसाद’ वाटला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. एवढा मोठा गैरप्रकार उघडपणे सुरू असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोपनीय शाखा आणि तहसीलदार नेमके कोणाच्या आशीर्वादाने डोळे झाकून बसले आहेत? असा थेट आरोप आता नागरिक करत आहेत.

प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे देण्याची मागणी

सापडलेली कवटी नेमकी कुठून आली? यावरून आता संशयाचे धुके गडद झाले आहे. हा मातीचा भराव मुंबईतील एखाद्या जुन्या पुलाच्या डेब्रिज कामातून (ढिगाऱ्यातून) आणला आहे की स्थानिक डोंगराच्या अवैध उत्खननातून आला आहे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज कवटी सापडली, उद्या पूर्ण मृतदेह सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

हा प्रकार केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नसून गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याने, पोलीस आणि तहसीलदार यांनी मूग गिळून गप्प न बसता या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवावा आणि ती कवटी कोणाची आहे याचा छडा लावावा, अशी तीव्र मागणी आता उरणच्या जनतेतून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!