वाहनांच्या वाढत्या वेगामुळे अपघातांचा धोका; ‘पीडब्ल्यूडी’ व तहसील प्रशासनाला दिले निवेदन
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील खोपटे-कोप्रोली या नव्याने काँक्रेटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि तहसील प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उरण-खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य वर्दळीचा मार्ग मानला जातो. या रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड आणि अवजड वाहनांची येथे सतत ये-जा सुरू असते. नुकतेच या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनचालकांचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे याच मुख्य मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण ये-जा करत असतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी अनेक किरकोळ अपघात घडले असून, भविष्यात येथे एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची दाट भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थ मंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या कारवान गोडाऊन जवळ, धसाखोशी / द. पी. पाडा बस स्टँड, म्हात्रेपाडा बस स्टँड, विरगो बस स्टँड या प्रमुख चौकांत आणि थांब्यांवर तातडीने गतिरोधक व वाहतूक सूचना फलक उभारण्याची मागणी केली आहे.
निवेदन सादर करताना ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार कल्पेश ठाकूर (गुरुजी) यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“रस्त्यांचा विकास आणि काँक्रिटीकरण स्वागतार्हच आहे; मात्र त्यासोबत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने येथे योग्य त्या उपाययोजना कराव्यात.” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या या अत्यंत रास्त मागणीची दखल घेत संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात या मार्गावर होणाऱ्या संभाव्य अपघातांना आणि जीवितहानीला संबंधित यंत्रणाच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
