• Thu. Jun 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आमदार रोहित पवार यांची करंजा गावाला भेट; मच्छीमार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार

ByEditor

Jun 4, 2026

उरण । अनंत नारंगीकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित दादा पवार यांनी ३ जून रोजी उरण तालुक्यातील करंजा गावाला सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक मच्छीमार समाज आणि शेतकरी वर्गाच्या विविध जिव्हाळ्याच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. करंजा येथे आगमन झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम येथील प्रसिद्ध श्री द्रोणागिरी माता मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. या मंदिराला मिळालेल्या पर्यटन क्षेत्राच्या दर्जाबाबत आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाबाबत त्यांनी स्थानिक ग्रामस्थांकडून सविस्तर माहिती घेतली.

त्यानंतर आमदार पवार यांनी करंजा मच्छीमार सोसायटीच्या कार्यालयाला भेट देऊन मच्छीमार बांधवांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मच्छीमारांना भेडसावणारा डिझेल कोटा आणि डिझेल परताव्याचा प्रश्न, करंजा बंदरातील विविध समस्या, मच्छीमारांच्या गावठाण विस्ताराचा प्रश्न, तसेच व्यापारी वर्गाकडून होणारी मच्छीमारांची फसवणूक यांबाबत त्यांनी माहिती घेतली. शासनाकडून मच्छीमार समाजाला नव्यानेच शेतकऱ्याचा दर्जा मिळाला असला, तरी आतापर्यंत याचा कोणताही लाभ मिळाला नसल्याची खंतही यावेळी मच्छीमारांनी त्यांच्याकडे व्यक्त केली.

या दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी नव्याने सुरू असलेल्या करंजा-रेवस पुलाच्या कामाची बोटीतून प्रत्यक्ष पाहणी केली. या पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार आणि शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. करंजा पोर्ट आणि या सर्व समस्यांबाबत आगामी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरू आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी यावेळी मच्छीमार व शेतकरी वर्गाला दिले.

या दौऱ्याचे आयोजन उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी केले होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, सिताराम नाखवा, मार्तंड नाखवा, के. एल. कोळी, रमेश भगत, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयेंद्र नाखवा, नरेश कोळी, उरण नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, कल्पेश थळी, मधुकर थळी, काँग्रेस नेते भालचंद्र घरत, मनोहर थळी, शैलेश डाऊर, देवदास थळी, मुकेश थळी, परेश म्हात्रे तसेच खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे आणि मोठ्या संख्येने करंजा ग्रामस्थ उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!