सावित्री नदीपात्रात बेकायदेशीर काम करणाऱ्यांना अझहर धनसे यांचा कडक इशारा
अनिकेत मोहित
श्रीवर्धन : सावित्री खाडीवरील आंबेत-म्हाप्रळ पुलाला धडक देऊन हजारो नागरिकांची गैरसोय करणाऱ्या बेजबाबदार बार्ज मालकावर अखेर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी प्रशासनाला दिलेल्या २८ जुलैच्या अल्टिमेटम आणि सततच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली. १७ जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर, १८ जुलै रोजी संबंधित बार्ज शोधून त्याचा रितसर पंचनामाही पूर्ण करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अल्टिमेटम ठरला निर्णायक
या दुर्घटनेनंतर दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १६ जुलै रोजी म्हसळा येथे आमरण उपोषण पुकारण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, बांधकाम विभागाने तक्रार देऊनही मंडणगड पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती.
हा प्रकार समोर आल्यानंतर अझहर धनसे यांनी आक्रमक पवित्रा घेत, “येत्या २८ जुलैपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडू,” असा खणखणीत इशारा दिला होता. पक्षाच्या या वाढत्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने वेगाने सूत्रे हलवत अखेर गुन्हा दाखल करून बार्जचा पंचनामा केला.
हा जनतेचा विजय: अझहर धनसे
या यशाबद्दल बोलताना अझहर धनसे म्हणाले,”हा विजय केवळ आमच्या पक्षाचा नसून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम जनतेचा आहे. नागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आम्ही ही लढाई लढू शकलो.”
यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याबद्दल आभार मानले, तसेच पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आता कोणतीही हयगय न करता कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
या जनहिताच्या लढ्यात खंबीर साथ दिल्याबद्दल धनसे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, रायगड जिल्हा प्रभारी खा. सुरेश म्हात्रे (उर्फ बाळ्या मामा), रत्नागिरी जिल्हा निरीक्षक विजय देसाई आणि सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
बेकायदेशीर काम करणाऱ्यांना सज्जड दम
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर धनसे यांनी खाडीपट्ट्यात बेकायदेशीर काम करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. “यापुढे सावित्री नदीच्या पात्रात किंवा खाडीपट्ट्यामध्ये चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने काम करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. जनतेच्या जिवाशी आणि हिताशी खेळणाऱ्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.
