• Sun. Jul 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

ByEditor

Jul 19, 2026

विनायक पाटील
​पेण :
पेण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण शंकर पाटील यांनी १९ जुलै रोजी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केला असून, त्यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे पेणच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

​जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रवीण पाटील यांनी, पक्षाने आजवर आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत. मात्र, सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत आपल्या विचारांनुसार आणि अपेक्षांनुसार पक्षीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे शक्य होत नसल्याची जाणीव झाल्याने, संघटनेच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. पद सोडत असले तरी “भविष्यातही जनतेची सेवा हेच माझे ध्येय राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

​इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले प्रवीण पाटील गेल्या काही वर्षांपासून पेण शहर काँग्रेसचे खंबीरपणे नेतृत्व करत होते. एक सक्रिय नगरसेवक आणि शहराध्यक्ष म्हणून त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या या राजीनाम्याने पेण काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!