• Mon. Jul 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देशाच्या पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’मध्ये माणगावच्या अनिकेत येरुणकरचे योगदान

ByEditor

Jul 19, 2026

सलीम शेख
माणगाव
: भारतीय रेल्वेच्या इतिहासात हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने टाकल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक असलेल्या देशातील पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’ प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे येथील माजी विद्यार्थी आणि माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील कोस्ते येथील अनिकेत येरुणकर यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षणाचा देशपातळीवर गौरव झाला आहे. अनिकेत येरुणकर हा माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावचा रहिवासी असून त्यांच्या या यशामुळे माणगाव, विद्यापीठासह संपूर्ण राज्याला अभिमान वाटत आहे.

कार्बनमुक्त, पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने भारत झेपावत असताना या ऐतिहासिक प्रकल्पात महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने बजावलेली भूमिका राज्यातील गुणवंत युवकांची क्षमता आणि तांत्रिक कौशल्य अधोरेखित करणारी ठरली आहे. संशोधन, नवकल्पना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील विद्यार्थी देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचा हा प्रेरणादायी पुरावा मानला जात आहे.

याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिकेत येरुणकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, “उद्योगांना आवश्यक असलेले कुशल, सक्षम आणि जागतिक दर्जाचे मनुष्यबळ घडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. अनिकेत यांचे यश हे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यामुळे राज्याच्या तंत्रशिक्षणाचा देशभर सन्मान वाढला आहे.”

यावेळी त्यांनी अनिकेत येरुणकर यांच्या या यशामागे मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्राध्यापकांचे, संशोधकांचे आणि संपूर्ण विद्यापीठ परिवाराचेही विशेष अभिनंदन केले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे महाराष्ट्र ज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम ठरत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनिकेत येरुणकर यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना संशोधन, नवतंत्रज्ञान आणि राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे. त्याच्या यशामुळे कोस्ते, माणगाव आणि रायगडचे उज्ज्वल झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!