कर्जत : गणेश पवार
जंगलात प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने झाडण्यात आलेली गोळी एका निष्पाप बालकाला लागल्याची धक्कादायक घटना नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मौजे कुरूंग (पोस्ट बोरगाव) येथे ३ जून रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या गोळीबारात ९ वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खेळताना घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सुमन रामदास सराई या ३ जून रोजी सकाळी आपल्या घराबाहेर कपडे धुत होत्या. त्याच वेळी त्यांचा ९ वर्षांचा मुलगा हेमंत रामदास सराई हा घरासमोरील मोकळ्या जागेत एकटाच खेळत होता. दरम्यान, जंगलात प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने वावरत असलेल्या एका अज्ञात इसमाने आपल्या ताब्यातील बंदुकीतून अत्यंत निष्काळजीपणे गोळी झाडली. या बंदुकीच्या गोळीचे छर्रे थेट लहानगा हेमंत याला लागले.
चिमुरड्याच्या अंगात घुसले छर्रे
हा गोळीबार इतका भीषण होता की, गोळीचे छर्रे हेमंतच्या दोन्ही मांड्या, हात आणि चेहऱ्यावर लागले. अचानक झालेल्या या हल्ल्याने आणि वेदनेने मुलगा रडू लागल्याने आई सुमन सराई यांच्या हा प्रकार लक्षात आला. कुटुंबियांनी तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंतला उचलून उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल केले. तिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमी मुलाची आई सुमन रामदास सराई यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात शिकारी विरोधात गुरनं. ११७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, १२५ (अ) तसेच शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काजरोळकर करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा बेकायदेशीर शिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
