उरण | घन:श्याम कडू
उरण तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेनंतर अनेक हॉटेल्स, पानटपऱ्या, फास्टफूड सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. काही व्यावसायिकांनी तर घाईघाईने दुकाने बंद ठेवल्याचेही दिसून आले. मात्र एवढा गाजावाजा झाल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा अधिकृत तपशील जाहीर न केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उरणमध्ये नेमक्या किती हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली? किती अन्ननमुने घेण्यात आले? ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले का? किती नमुने निकृष्ट आढळले? किती जणांना नोटिसा देण्यात आल्या? किती आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली? किती परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले? या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने अद्याप दिलेले नाही.
विशेष म्हणजे, धाड पडल्याची माहिती मिळताच काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली, अशी चर्चा असूनही प्रशासनाकडून त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कारवाई प्रत्यक्षात झाली की केवळ धाड टाकल्याचा दिखावा करण्यात आला? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
उरणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विनापरवाना खाद्यविक्री, अस्वच्छ हॉटेल्स, रस्त्याच्या कडेला उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ, मुदतबाह्य वस्तू, तसेच गुटखा व इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. मात्र तक्रारींच्या तुलनेत ठोस कारवाईचे चित्र फारसे दिसत नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा कोणत्याही विभागासाठी केवळ कागदोपत्री कारवाईचा विषय नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने उरणमधील तपासणीचा संपूर्ण तपशील तातडीने प्रसिद्ध करावा. कारवाई झाली असेल तर ती जनतेसमोर आणावी; झाली नसेल तर त्यामागील कारणे स्पष्ट करावीत.
कारवाईचा तपशील जाहीर करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? नेमके कोणाला वाचवले जात आहे? असा संशय अधिक गडद होण्यास वाव मिळत असून, या प्रकरणात पारदर्शकता राखणे ही अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असल्याची मागणी उरणकरांकडून होत आहे.
