धाटाव | शशिकांत मोरे
रोहे शहरातील तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह विशेषतः युवक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रोहा शहर प्रमुखपद रिक्त होते. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते व पालकमंत्री भरत शेठ गोगावले तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर व रायगड लोकसभा मतदारसंघ प्रमुख अनिल नवगणे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकाश कोळी यांनी यापूर्वी रोहा नगरपालिका शिक्षण मंडळ तसेच विविध पदांवर जिद्द आणि चिकाटीने कार्य केले आहे. त्यांच्या अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
”पक्षनेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून रोहा शहरात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहीन.”
— प्रकाश कोळी (नवनिर्वाचित शहर प्रमुख, शिवसेना)
दरम्यान, या नियुक्तीबद्दल शिवसेनेच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांकडून प्रकाश कोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षाला यामुळे पुन्हा एकदा नवचैतन्य मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
