माणगाव | सलीम शेख
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित माणगाव–इंदापूर बायपास गणेशोत्सवापूर्वी किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. मात्र, गेली १७ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची सध्याची संथ गती आणि कोकणातील मुसळधार पावसाचे संकट पाहता, हे आश्वासन केवळ ‘तारीख पे तारीख’ ठरेल की काय, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधींचे दौरे आणि आश्वासने
नुकतीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बायपासची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी, ग्रामविकास मंत्री भरत गोगावले यांनीही आढावा घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. वारंवार होणाऱ्या या पाहणी दौऱ्यांमुळे कामात गती येईल, अशी आशा निर्माण झाली होती, मात्र प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती पाहता आश्वासनांचा फुगा फुटल्याचे चित्र आहे.
पावसामुळे कामात तांत्रिक अडचणी
सध्या कोकणात पावसाचा जोर कायम आहे. अशा स्थितीत रस्ता आणि पुलांचे काम पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.
- पुलांची अपूर्ण कामे: कोकण रेल्वे उड्डाणपूल आणि गोध नदीवरील पुलाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी फक्त कॉलम उभे असून, गर्डर, डेक स्लॅब आणि जोडरस्त्यांची कामे बाकी आहेत.
- मातीचा भराव: पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर मातीचा भराव टाकणे आवश्यक असते, जे पावसाळ्यात अशक्य आहे. या तांत्रिक अडथळ्यांमुळे अभियंते आणि स्थानिक जाणकारही गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू करण्याच्या शक्यतेवर साशंक आहेत.
नागरिकांचा रोष आणि संशय
दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर बायपासच्या कामाची चर्चा आणि आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात काम पुढे सरकत नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. “लोकप्रतिनिधींना केवळ निवडक कामाचा भाग दाखवून अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. गेल्या १७ वर्षांत मिळालेल्या केवळ मुदती आणि अपूर्ण कामे यामुळे प्रशासनावरील विश्वास उडाला आहे,” असे मत व्यक्त होत आहे.
“गणेशोत्सव आला की बायपासची आठवण आणि आश्वासनांचा पाऊस पडतो, हा जुना पायंडा आहे. पूर्वी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या माध्यमातून या विषयांवर चर्चा व्हायची, आता तीही बंद आहे. सर्व्हिस रोड नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आहे आणि शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. आता केवळ आश्वासने नकोत, तर ठोस कृती हवी.”
— ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक, माणगाव.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण असून चाकरमान्यांच्या मोठ्या लोंढ्यामुळे माणगाव शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो. आता प्रशासनाने निव्वळ घोषणेपेक्षा युद्धपातळीवर काम करून कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

