• Tue. Jul 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई: ३५ लाखांचा चरस जप्त; ६३ वर्षीय आरोपी जेरबंद

ByEditor

Jul 20, 2026

शेखाडी परिसरात पोलिसांनी रचला सापळा | ७ किलो चरस हस्तगत | ‘एनडीपीएस’अंतर्गत गुन्हा दाखल

​श्रीवर्धन | अनिकेत मोहित
रायगड जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी बजावत श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३४ लाख ९८ हजार रुपये किमतीचा ६.९९६ किलो (सुमारे ७ किलो) चरस जप्त करण्यात आला असून, सादिक इब्राहिम शेखदर (वय ६३, रा. शेखाडी) या वृद्धाला अटक करण्यात आली आहे.

​गोपनीय माहितीवरून रचला सापळा

​१८ जुलै रोजी शेखाडी परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली कोंडिवली स्मशानभूमीजवळ सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी मोटारसायकलवरून येत असताना त्याला थांबवून झडती घेतली असता, वाहनाच्या डिकीमध्ये २.१४६ किलो चरस आढळून आला. पोलिसांनी तात्काळ अमली पदार्थ, मोबाईल आणि मोटारसायकल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले.

​घरावरील छाप्यात आणखी चरस जप्त

​या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या सखोल चौकशीत आरोपीने आणखी अमली पदार्थ लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या शेखाडी येथील घरावर छापा टाकून फायबरच्या बोटीत लपवून ठेवलेला ४.८५० किलो चरस जप्त केला. या संपूर्ण कारवाईत एकूण ३४.९८ लाख रुपये किमतीचा ६.९९६ किलो चरस हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

​वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी

​ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस नाईक प्रदीप राठोड, अनिल हिवाळे, कुषहरी कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप राठोड करत आहेत.

​श्रीवर्धन पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!