अलिबाग | प्रतिनिधी
अहिल्यानगर येथील विसापूर खुल्या कारागृहातून पळून गेलेल्या दोन शिक्षाधीन बंद्यांना अलिबाग स्थानिक गुन्हे शाखा आणि कोलाड पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले आहे. शिऱ्या उर्फ श्रीकांत बारकू पवार (वय ४१, रा. वाकी, ता. अलिबाग) आणि किसन बारकू गांगड (रा. धामणी, ता. इगतपुरी) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विसापूर खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असताना, हे दोन्ही बंदी कारागृहाच्या बगीच्यात शेतीचे काम करत होते. दरम्यान, तेथून त्यांनी पलायन केले होते. या प्रकारानंतर विसापूर कारागृहाचे अधीक्षक श्री. इनामदार यांनी बेलवंडी पोलिसांत धाव घेऊन याबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. हे आरोपी मूळचे रायगड जिल्ह्यातील असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी कारागृह प्रशासनाने स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली होती.
रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला या दोन्ही आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पीएसआय सूरज पाटील, हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील, हेड कॉन्स्टेबल कराडे आणि कोलाड पोलीस ठाण्यातील पीएसआय महाडिक, हेड कॉन्स्टेबल गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल रसाळ यांच्या पथकाने सापळा रचला. या संयुक्त पथकाने शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अलिबाग पोलिसांनी तात्काळ बेलवंडी पोलीस ठाणे (अहिल्यानगर) आणि विसापूर जिल्हा कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना या कारवाईची माहिती दिली. या प्रकरणाची सविस्तर नोंद संबंधित पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
