पनवेलमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ; स्वाभिमानासाठी पद सोडल्याची म्हात्रेंची प्रतिक्रिया
उरण । घन:श्याम कडू
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला आहे. म्हात्रे यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.
‘माझ्या प्रामाणिकतेवर आणि स्वाभिमानावर संशय’
राजीनाम्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले, “मी नेहमीच पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवा या मूल्यांवर विश्वास ठेवून राजकारण केले आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि वरिष्ठांचे आदेश मी नेहमीच शिरसावंद्य मानले. मात्र, अलीकडच्या काळात पक्षाच्या आदेशांचे पालन करत असतानाच, माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले.”
आपल्या भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, “मला भ्रष्ट, विकाऊ किंवा स्वार्थासाठी भूमिका बदलणारा नेता म्हणून हिणवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या अनेक वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीवर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे अत्यंत वेदनादायक आहे. जेव्हा प्रामाणिकतेवर आणि स्वाभिमानावर संशय घेतला जातो, तेव्हा पदावर चिकटून राहणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे.”
“हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून माझ्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी आहे. पदे येतात आणि जातात, मात्र माणसाची प्रतिमा, तत्त्वनिष्ठा आणि जनतेचा विश्वास हेच खरे आयुष्यभराचे भांडवल असते.”
– अरविंद म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते, पनवेल मनपा.
आपल्या राजकीय प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पनवेलच्या जनतेचे त्यांनी मनापासून आभार मानले. “भविष्यात कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, मी जनतेच्या सेवेसाठी आणि पक्षाच्या विचारांसाठी सातत्याने कार्यरत राहीन,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अरविंद म्हात्रे यांच्या या राजीनाम्यामुळे पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या नेतृत्वाचा पेच आता निर्माण झाला आहे. आगामी काळात मनपाच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते आणि या राजीनाम्याचे काय राजकीय पडसाद उमटतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
