• Fri. Jun 5th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटात शौचासाठी थांबलेला प्रवासी खोल दरीत कोसळला; रेस्क्यू टीमच्या तत्परतेने वाचला जीव

ByEditor

Jun 5, 2026

रायगड । अमुलकुमार जैन
कोकणातून पुण्याकडे प्रवास करत असताना शौचासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका प्रवाशाचा ताम्हिणी घाटातील खोल दरीत कोसळून गंभीर अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) पहाटे घडली. मात्र, पोलिसांची तत्परता, स्थानिक रेस्क्यू टीम आणि ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थे’च्या वेगवान कामगिरीमुळे अवघ्या ४५ मिनिटांत या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले असून परिसरात रेस्क्यू टीमच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

अंधारामुळे दरीचा अंदाज चुकला

संदेश विश्राम हाडवळे (वय ४७, रा. मुळशी सेक्टर-४, पुणे) असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. संदेश हाडवळे हे आपल्या मुलासह कारने चिपळूणहून पुण्याच्या दिशेने चालले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांची कार ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंट परिसरात आली असता, शौचास लागल्याने हाडवळे यांनी कार रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, पहाटेचा दाट अंधार असल्याने त्यांना दरीचा अंदाज आला नाही आणि पाय घसरून ते थेट खोल दरीत कोसळले. वडील अचानक नजरेआड झाल्याने आणि दरीतून मदतीचा आवाज ऐकू आल्याने घाबरलेल्या मुलाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली.

४५ मिनिटांत थरारक रेस्क्यू ऑपरेशन

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे आपत्कालीन बचाव पथक तातडीने दोरखंड व आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. पहाटेची वेळ आणि दाट अंधार यामुळे शोधमोहिमेत मोठे अडथळे येत होते, तरीही पथकाने जीवाची परवा न करता दरीत उतरून शोध सुरू केला.

रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर यांनी सांगितले की, “अथक प्रयत्नांनंतर अवघ्या ४५ मिनिटांत दरीत जखमी अवस्थेत असलेल्या संदेश हाडवळे यांचा शोध लागला. त्यानंतर रोप व विशेष बचाव साहित्याच्या साहाय्याने त्यांना सुरक्षितपणे दरीतून वर काढण्यात आले.”

या भीषण अपघातात हाडवळे यांच्या पायाचे हाड मोडले असून शरीरावर इतर ठिकाणीही गंभीर जखमा झाल्या आहेत. दरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचा वेळेवर मिळालेला प्रतिसाद आणि रेस्क्यू टीमच्या शौर्यामुळे एका प्रवाशाचा जीव वाचल्याने हाडवळे यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे व बचाव पथकाचे आभार मानले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!