वैदिक मंत्रोच्चार, पालखी सोहळा, राजसदरावरील अभिषेक आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड शिवमय
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर आज इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला.

यावेळी आमदार संजय चव्हाण, आमदार अभिजित पाटील, नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उप जिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनी सकाळी 7 वाजता नागारखान्यात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण संपन्न झाले. सकाळी 7.30 वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे आगमन झाले आणि त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीचा अभिषेक करण्यात आला. श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारुढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.

युवराज संभाजी छत्रपती महाराज शिवभक्तांना संबोधित केले. शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन जगदीश्वर मंदिरात पोहचली. जगदीश्वर मंदिर येथे युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.

नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम, मर्दानी खेळ आणि भगव्या पताकांनी सजलेल्या या मिरवणुकीने शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला. त्यानंतर राजसदरावर आयोजित मुख्य सोहळ्यात संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने आणि लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषेतील युवक-युवती, मावळे आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण रायगड परिसर शिवकालीन वातावरणाने भारावून गेला होता.

सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते. शिवप्रेमींसाठी मोफत बससेवा, अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था, सावलीसाठी मंडप आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह होळीचा माळ येथील नियंत्रण कक्ष, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, राजसदर आणि अन्नछत्राची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी शिवभक्तांशी संवाद साधून त्यांच्या सोयी-सुविधांची विचारपूस केली तसेच सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा आणि शिवरायांच्या विचारांचा जागर करणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दुर्गराज रायगडावर आज पुन्हा एकदा शिवकालीन तेज, शौर्य आणि स्वाभिमानाचा जागर अनुभवायला मिळाला.
