शासकीय विश्रामगृहाशेजारील स्मशानभूमीत वीज गुल; प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नागरिकांचा प्रहार
श्रीवर्धन । संदेश घोलप
एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पर्यटन विकासाच्या आणि हायटेक सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र जनतेला अंतिम विधीसाठीही अंधारात चाचपडायला लागत असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीवर्धनमध्ये समोर आला आहे. येथील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या मुख्य स्मशानभूमीत वीज पुरवठा नसल्यामुळे, एका मृतदेहावर चक्क मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली. या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरुद्ध संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
व्ही.आय.पी. विश्रामगृहाजवळ लखलखाट, स्मशानभूमीत मात्र अंधार!
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धनमधील एका नागरिकाच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ मुख्य स्मशानभूमीत पोहोचले होते. या स्मशानभूमीच्या अगदी शेजारीच शासकीय विश्रामगृह आहे, जिथे मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी विजेचा चकाका असतो. मात्र, अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या स्मशानभूमीत साधी विजेची सोय नसल्याने संपूर्ण अंधार पसरला होता. अखेर संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू करून, त्या प्रकाशात अतिशय क्लेशदायक परिस्थितीत अंत्यविधी पार पाडला.
राज्य सरकारच्या कॅबिनेट पातळीवरील मंत्री या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. असे असताना मुख्य शहरातील स्मशानभूमीत साधी लाईट नसावी, याबद्दल नागरिकांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीकेची झोड
या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनावर कडक शब्दांत टीका होत आहे. “निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागणारे नेते एरवी मात्र जनतेला मूलभूत सुविधांसाठी वाऱ्यावर सोडून देतात,” अशी भावना नागरिकांनी बोलून दाखवली. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि विकासकामांच्या दाव्यांवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रीवर्धनकर जनतेचे सवाल:
- पर्यटन आणि विकासाचे दावे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुख्य स्मशानभूमीत साधा एक विजेचा बल्ब किंवा सौरऊर्जेचा दिवा बसवता आला नाही का?
- शासकीय विश्रामगृहावर व्ही.आय.पी. संस्कृतीसाठी कोट्यवधींचा खर्च होतो, मग सर्वसामान्यांच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष का?
- या गंभीर निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार का?
“मंत्र्यांनी लाज बाळगावी, मतं मागताना विकास कुठे गेला?”
या प्रकारावर श्रीवर्धनचे स्थानिक नागरिक चंद्रकांत भगत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत निषेध नोंदवला. ते म्हणाले, “मंत्र्यांचे दौरे असले की विश्रामगृहावर रात्रीचा दिवस केला जातो. मग त्याच्याच शेजारी असलेल्या स्मशानभूमीत सर्वसामान्यांच्या अंत्यविधीसाठी लाईट का नाही? माणसाला मरताना तरी सन्मान मिळावा की नाही? निवडणुका आल्या की गल्लोगल्ली मतं मागत फिरणारे नेते स्मशानभूमीत साधा एक जनरेटर किंवा विजेचा बल्ब लावू शकत नाहीत का? सामान्य जनतेच्या पैशांवर सत्तेची मलाई खाणाऱ्यांना गरिबांच्या या यातना कधी समजणार? जोपर्यंत इथे कायमस्वरूपी विजेची सोय होत नाही, तोपर्यंत आम्ही प्रशासनाला जाब विचारत राहू.” -चंद्रकांत भगत – स्थानिक नागरिक
अंधारात झालेल्या या अंत्यविधीच्या घटनेने श्रीवर्धनमधील विकासकामांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. आता तरी या असंवेदनशील नगरपरिषद प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
