श्रीवर्धन : श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १० किलो ५५८ ग्रॅम वजनाची अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली होती. त्यानंतर रायगड पोलिस सतर्क झाले होते.
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. तसेच या शोध मोहिमेबाबत सर्व सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मच्छीमार सोसायट्या आणि सागरी सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले होते. रविवारी शोध मोहीम सुरू असताना संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन बीच येथे अफघान प्रोडक्ट नाव असलेली नऊ अंमली पदार्थांची पाकिटे सापडली. यासर्व पाकिटांचे वजन १० किलो ५५८ ग्रॅम आहे. या सर्व घटनेचा तालुका दंडाधिकारी यांचे समक्ष पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (व), २० (5) (२) (ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
