सर्व शाळा आणि अंगणवाड्या आता सकाळच्या सत्रात भरणार!
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी प्रचंड उष्णता आणि दमट हवामान लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला आहे. आता दुपारच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळा दिनांक १९ जून २०२६ पासून ते ३० जून २०२६ पर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन ना. जावळे यांनी दिले आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि गडगडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनोच्या (El Niño) प्रभावामुळे यंदा मान्सून अद्याप रायगड जिल्ह्यात पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. परिणामी, वातावरणातील उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, लहान मुलांचे आरोग्य आणि हित लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. अलिबाग) आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
या विनंतीचा आणि हवामान खात्याच्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करून, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कायदेशीर अधिकारांचा वापर करत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा दुपारऐवजी केवळ सकाळच्या सत्रात चालवल्या जातील. या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवार, १९ जूनपासूनच तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
