• Thu. Jun 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन : स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; प्रक्रिया थांबविण्याची महावितरणकडे मागणी

ByEditor

Jun 18, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरणच्या श्रीवर्धन शाखेकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जुन्या वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, स्मार्ट मीटरमुळे वीजबिलामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणने प्रथम नागरिकांना या योजनेची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मीटर बदलण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जुन्या मीटरचे रीडिंग, त्याची स्थिती तसेच बदलापूर्वी आणि बदलानंतरची छायाचित्रे यांची नोंद ठेवण्यात यावी, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे. भविष्यात वीजबिल किंवा मीटरबाबत कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी योग्य पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

महावितरण प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊन स्पष्ट भूमिका जाहीर करावी. अन्यथा श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

स्मार्ट मीटर योजनेबाबत महावितरण प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेते, याकडे श्रीवर्धनमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!