उरण । अनंत नारंगीकर
वाढता उन्हाळा आणि जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाने मारलेली दडी, यामुळे आधीच उरणकर पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यातील जनतेसाठी राखीव ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावरच टँकर आणि भूमाफियांनी डल्ला मारला आहे. सिडको, एमआयडीसी (MIDC) आणि लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कथित आशीर्वादामुळेच उरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे रानसई, पुनाडे आणि हेटवणे धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
जलवाहिन्या फोडून फार्म हाऊस, कंटेनर यार्डला पुरवठा
मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई आणि उरणच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सिडको अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे या मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी अनाधिकृत नळ कनेक्शन जोडले गेले आहेत. हे चोरीचे पाणी बेकायदेशीरपणे सर्व्हिस सेंटर, आलिशान फार्म हाऊस, मोठ्या इमारतींचे बांधकाम आणि कंटेनर यार्डसाठी टँकरद्वारे पुरवले जात आहे.
असाच प्रकार एमआयडीसीच्या अखत्यारीत असलेल्या रानसई धरणाच्या बाबतीतही घडत आहे. रानसईतून उरण शहर आणि प्रकल्पांना पाणी दिले जाते, परंतु येथेही बेधडकपणे पाण्याची चोरी सुरू आहे. तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील पुनाडे धरणातून आठ गाव कमिटीमार्फत होणाऱ्या पुरवठ्यावरही या पाणी चोरांनी वक्रदृष्टी टाकली आहे.
शेतकरी आणि नागरिक दुहेरी संकटात
“जून महिन्याचे दोन आठवडे उलटून गेले तरी पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग आधीच पेरण्यांविषयी चिंतेत आहे. त्यातच हक्काचे पिण्याचे पाणीही चोरीला जात असल्याने उरणकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तात्काळ या पाणी चोरांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.” — स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी
धरणक्षेत्रातून होणारी ही पाणीचोरी जर तात्काळ रोखली नाही, तर आगामी काळात उरण आणि नवी मुंबई परिसराला भीषण पाणीबाणीला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता यावर संबंधित प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
