• Tue. Aug 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मनसेला खिंडार! माणगावात पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

ByEditor

Aug 3, 2026

“रायगडचा पालकमंत्री मीच होणार, केवळ अधिकृत घोषणा बाकी” : मंत्री भरत गोगावले यांचा दावा

सलीम शेख
माणगाव :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच रायगड जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. माणगाव व तळा तालुक्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. २ ऑगस्ट) शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

दरम्यान, “सर्वसामान्य जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असून, त्यावर केवळ अधिकृत घोषणेचे (डिक्लेरेशन) शिक्कामोर्तब होणे बाकी आहे,” असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी या प्रसंगी बोलताना केला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव तालुक्यातील पाणसईचे रहिवासी तसेच मनसेचे माजी संपर्कप्रमुख व ज्येष्ठ नेते दिलीप सांगले, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे प्रतीक रहाटे यांच्यासह माणगाव व तळा तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शिवसेनेत योग्य सन्मान दिला जाईल, असे आश्वासन दिले.

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : भरत गोगावले

उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले, “कार्यकर्त्यांनी संघटनेचे काम प्रामाणिकपणे करावे. महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघातील कोणत्याही तालुक्याला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही. येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. तसेच, आपल्या क्षेत्रात येणाऱ्या कंपन्या या प्रदूषणविरहित असायला हव्यात. चांगल्या उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याने अशा प्रकल्पांना कोणीही अडथळा आणू नये.”

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे रायगड-रत्नागिरी लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र माणकर, माणगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, शहर संपर्कप्रमुख प्रसाद धारिया, शहरप्रमुख नितीन दसवते, डॉ. परेा उभारे, ॲड. अच्युत तोंडलेकर, रणधीर कनोजे, सौरभ खैरे, प्रवीण बागवे आणि फैमिद जामदार यांच्यासह माणगाव व तळा तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर, ॲड. महेंद्र माणकर यांच्यासह प्रवेशकर्ते दिलीप सांगले व प्रतीक रहाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!