• Mon. Aug 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

फोटोच्या नादात कार ६० फूट दरीत कोसळली; सुदैवाने झाडामुळे अनर्थ टळला!

ByEditor

Aug 3, 2026

खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ परिसरातील थरार; बोरघाट पोलिसांच्या तत्परतेमुळे पर्यटकाचा जीव बालंबाल वाचला

खंडाळा | प्रतिनिधी
खंडाळा घाटातील निसर्गसौंदर्य आणि आशिया खंडातील सर्वात लांब ठरणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह एका पर्यटकाला चांगलाच महाग पडला आहे. फोटो काढण्याच्या नादात तीव्र उतारावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने आलिशान कार थेट ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, कार दरीतील एका मोठ्या झाडात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीवाची बाजी लावून दरीत उतरत चालकाला सुखरूप बाहेर काढले.

मोहित स्वरूप भटनागर (वय ५९, सध्या रा. वांद्रे, मुंबई, मूळ रा. गुरुग्राम, हरियाणा) असे अपघातातून सुखरूप वाचलेल्या पर्यटकाचे नाव आहे.

निसर्गसौंदर्याच्या नादात धोकादायक धाडस

बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित भटनागर हे आपल्या स्कोडा कारने (क्रमांक – MH 04 FR 7143) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने पर्यटनासाठी येत होते. खंडाळा घाटमाथा व मिसिंग लिंक बोगद्याच्या वरील परिसरातील नयनरम्य दृश्य पाहून त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

त्यांनी खंडाळा घाटातून मार्ग काढत थेट ‘गारमाळ’ परिसर गाठला. तेथे गाडी मुख्य रस्त्यावर उभी न करता, कोणताही रस्ता नसताना त्यांनी उंच डोंगर, टेकड्या व तीव्र उतारावरून धोकादायकरित्या गाडी नेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार चार-पाच पलट्या खात थेट ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली.

दरीत झाड बनले ‘देवदूत’

दरीत कोसळणारी कार सुदैवाने एका मोठ्या झाडात जाऊन अडकली. जर कार या झाडाला अडकली नसती, तर ती थेट खाली निर्माणाधीन असलेल्या ‘मिसिंग लिंक’च्या मुख्य मार्गावर कोसळली असती आणि मोठा भीषण अपघात घडला असता. झाडामुळे वेग मंदावल्याने आणि गाडी अडकल्याने कारचालक भटनागर हे केवळ किरकोळ जखमी झाले.

महामार्ग पोलिसांचे जीवाची बाजी लावून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे, संतोष गुजरवार आणि गोडसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अत्यंत तीव्र उतार आणि खोल दरीत उतरणे धोकादायक असतानाही पोलिसांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्थानिकांच्या मदतीने दरीत प्रवेश केला. कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महामार्ग पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे एका पर्यटकाचे प्राण वाचले असून, या बचावकार्याबद्दल महामार्ग पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!