• Tue. Aug 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

५ हजारांची लाच घेताना बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रातील कर्मचारी जाळ्यात

ByEditor

Aug 4, 2026

अनिकेत मोहित
श्रीवर्धन :
बोगस डॉक्टर असल्याचे सांगून कारवाईची धमकी देत तक्रारदाराकडून लाच मागणाऱ्या बोर्ली पंचतन (ता. श्रीवर्धन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. घनश्याम बेलाजी कोमटवार (वय २२, वर्ग-३ कर्मचारी) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कारवाईची धमकी अन् १० हजारांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घनश्याम कोमटवार याने तक्रारदाराला “तुम्ही बोगस डॉक्टर आहात, तुमच्यावर रेड टाकून कारवाई करेन” अशी धमकी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने तत्परता दाखवत थेट रायगड ACB युनिटकडे तक्रार दाखल केली.

आरोग्य केंद्राबाहेरील रस्त्यावर रचला सापळा

ACB च्या पथकाने ३ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तडजोडीनंतर आरोपी ५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. सोमवारी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी असल्याने आरोपीने तक्रारदाराला बाहेर बोलावले.

दुपारी सुमारे ३.५५ ते ४.१५ वाजेच्या सुमारास, बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेरील रस्त्यावर तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB च्या पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान आरोपीच्या हातावर आणि जीन्स पॅन्टच्या खिशावर अँथ्रासिन पावडर आढळून आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (PC Act कलम ७) गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायगड युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सरिता आय. एस. भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील आणि नवदित नांदगावकर यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

📢 ACB चे नागरिकांना आवाहन

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी अजिबात न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!