• Tue. Aug 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रमोदशेठ म्हसकर प्रतिष्ठानचा पुढाकार! कोलाड-आंबेवाडी उड्डाणपुलाखालील जीवघेणे खड्डे बुजवले; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

ByEditor

Aug 4, 2026

कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाखाली आणि सर्व्हिस रोडवर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवून प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे दररोज प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, कोणत्याही पदावर वा सत्तेवर नसतानाही प्रतिष्ठानच्या वतीने हे जीवघेणे खड्डे तातडीने बुजवून महामार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित करण्यात आला आहे.

ठेकेदार अन् प्रशासनाचा कानाडोळा; बस कलंडता कलंडता बचावली!

गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे या उड्डाणपुलाखालील मुख्य रस्ता आणि दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड पूर्णपणे उखडले होते. येथे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत होते. यावर उपाययोजना करावी म्हणून नागरिक व प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठवला, परंतु प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला.

मागील दोन दिवसांत खड्ड्यांची अवस्था अत्यंत भयानक झाली होती. दुचाकी आणि चारचाकी वाहने या खड्ड्यांत अडकून पडत होती. नुकतीच एक प्रवासी बस या खड्ड्यातून जात असताना कलंडता कलंडता थोडक्यात बचावली. या थरारक दृश्यामुळे प्रवासी व पादचाऱ्यांच्या छातीत धडकी भरली होती.

बातम्यांची दखल अन् तातडीने प्रत्यक्ष कारवाई

वृत्तपत्रे, बातम्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खड्ड्यांच्या भीषण दृश्यांची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेठ म्हसकर यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देऊन खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. काही तासांतच रस्ता सुरळीत करून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यात आला.

‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’… प्रशासनावर ताशेरे

गेल्या १६-१७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली असून नवे उड्डाणपूलही धोकादायक स्थितीत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी केवळ आढावा बैठका घेण्यापुरते मर्यादित राहिले असून ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असाच प्रकार सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

वृत्तपत्रे व प्रमोदशेठ म्हसकर प्रतिष्ठानचे आभार

लोकसमस्येला वाचा फोडणारे वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या व त्यांचे प्रतिनिधी आणि प्रत्यक्ष कृती करून खड्डे बुजवणारे प्रमोद शेठ अनंत म्हसकर व त्यांच्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचे कोलाड परिसरातील जनता व प्रवाशांकडून मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!