• Tue. Aug 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईचा माणगावात जबरदस्त धसका!

ByEditor

Aug 4, 2026
AI Generated Image

बाजारपेठेत एकच खळबळ; स्वच्छता, परवाने, अन्नाचा दर्जा तपासण्याची व्यापाऱ्यांची धावपळ

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

माणगाव । सलीम शेख
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संभाव्य तपासणीची चाहूल लागताच माणगावच्या बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. “पथक कधीही तपासणीसाठी येऊ शकते,” या शक्यतेने अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अक्षरशः धसका घेतला असून, दुकानांमधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, परवाने, नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हॉटेल, खानावळी, बेकरी, मिठाई दुकाने, किराणा व्यापारी, चहा-नाश्त्याच्या टपऱ्या, वडापाव व फास्ट फूड विक्रेते तसेच रस्त्यालगत खाद्यपदार्थ विकणारे लहान व्यावसायिक यांच्यात विशेष सतर्कता निर्माण झाली आहे. अनेकांनी दुकानांची साफसफाई, मुदतबाह्य वस्तूंची छाननी, अन्नपदार्थांची योग्य साठवण, स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि त्यांचे पथक माणगावात तपासणीसाठी येणार असल्याची चर्चा पसरताच काही व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. काही दुकाने काही काळ बंद ठेवण्यात आल्याचीही चर्चा बाजारपेठेत होती. या घटनेनंतर व्यावसायिकांमध्ये “आता कोणत्याही क्षणी तपासणी होऊ शकते” अशी भावना निर्माण झाली असून, नियमांचे पालन करण्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

बाजारपेठेत अशीही चर्चा आहे की, काही व्यावसायिकांनी निकृष्ट दर्जाचा अथवा संशयास्पद माल विक्रीतून हटविला असून, आवश्यक परवाने अद्ययावत करण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, या बाबींची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या, निकृष्ट दर्जाचे किंवा मुदतबाह्य अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि अशा अचानक तपासण्या नियमितपणे सुरू राहाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास प्रामाणिक व्यापाऱ्यांना संरक्षण मिळेल, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि बाजारपेठेत दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध राहतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या कारवाईच्या धास्तीने का होईना, माणगावातील बाजारपेठेत शिस्त, स्वच्छता आणि नियमपालनाची सकारात्मक सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!