रो-रो ते फिशिंग जेट्टी परिसरात २०० हून अधिक अनधिकृत बांधकामे
तीन वेळा नोटिसा देऊनही कारवाई शून्य; राजकीय हस्तक्षेपाची जोरदार चर्चा
उरण । घनःश्याम कडू
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून (MMB) घारापुरी आणि रेवस किनारी भागातील अनधिकृत बांधकामांवर धडक तोडक कारवाईचा बडगा उचलला जात असताना, उरण तालुक्यातील करंजा परिसरात मात्र प्रशासनाची मेहेरनजर पाहायला मिळत आहे. करंजा रो-रो जेट्टी ते करंजा फिशिंग जेट्टी दरम्यानच्या परिसरात उभी राहिलेली शेकडो अनधिकृत बांधकामे आजही जैसे थे असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खारफुटीची कत्तल अन् शासकीय जागेवर बार, बिअर शॉपी!

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या किनारी पट्ट्यात परमिट रूम, बार, बिअर शॉपी, भंगाराची दुकाने, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक बांधकामांसह २०० हून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. यातील अनेक बांधकामे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खारफुटीची (मॅन्ग्रोव्ह्ज) तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. ही सर्व अतिक्रमणे शासकीय जागेवर असतानाही त्यांना परमिट रूम, बार व इतर व्यवसायांसाठी शासकीय परवानग्या कोणत्या आधारावर देण्यात आल्या, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
३ वेळा नोटिसा देऊनही ‘थंड’ कारभार; मंत्र्यांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा
या बेकायदेशीर बांधकामांविरोधात स्थानिकांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या, तसेच वृत्तपत्रांतून बातम्याही प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून काही मोठ्या इमारतींना तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात बुलडोझर फिरलेला नाही.
दरम्यान, ही कारवाई रोखण्यासाठी किंवा तिला स्थगिती मिळवण्यासाठी एका स्थानिक राजकीय नेत्याने थेट संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. प्रशासनाने याप्रकरणी पारदर्शकता ठेवून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
निष्पक्ष चौकशी अन् संयुक्त सर्वेक्षणाची मागणी
“कायदा सर्वांसाठी समान असेल तर करंजातही रेवसप्रमाणेच तात्काळ तोडक कारवाई झाली पाहिजे. नियम केवळ सर्वसामान्यांसाठी आणि सूट धनदांडग्यांसाठी, असे चित्र निर्माण होऊ नये. मेरीटाईम बोर्ड, रायगड जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाने या संपूर्ण परिसराचे संयुक्त सर्वेक्षण करून अतिक्रमणांवर हातोडा चालवावा अन् दोषींना पाठीशी घालणाऱ्यांचीही चौकशी करावी.”
— संतप्त स्थानिक नागरिक, उरण
