• Sat. Jun 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भंगाराच्या गाळ्यात गांजाची विक्री; ५७ वर्षीय इसमाला नागोठणे पोलिसांकडून रंगेहात अटक!

ByEditor

Jun 20, 2026

नागोठणे | नितीन गायकवाड
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री एक मोठी कारवाई केली आहे. मौजे चिकणी गावच्या हद्दीत एका भंगार विक्रीच्या गाळ्यामधून ४३८ ग्रॅम अवैध ‘गांजा’ या अंमली पदार्थासह एका ५७ वर्षीय आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी रात्री २२:३० वाजण्याच्या सुमारास नागोठणे पोलिसांना या बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाली. चिकणी गावच्या हद्दीतील गुलमोहर हॉटेलच्या शेजारी असलेल्या भंगार विक्रीच्या पत्र्याच्या गाळ्याच्या पाठीमागे आरोपीने हा अंमली पदार्थ विक्री व सेवनासाठी स्वतःच्या ताब्यात बाळगला होता. या कारवाईत पोलिसांनी मळकट काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेला एकूण ४३८ ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ जप्त केला आहे, ज्याची किंमत ४,३८०/- रुपये आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहन हुन्नु राठोड (वय ५७) असून तो मूळचा जळकोट तांडा, ता. सोलापूर येथील रहिवासी आहे व सध्या चिकणी, ता. रोहा, जि. रायगड येथे राहत होता.

​याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बळी विश्वनाथ पुटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. १११/२०२६ अंतर्गत गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(क) आणि २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात केली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!