• Mon. Jun 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा नगरपालिकेच्या पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (ऊबाठा) आक्रमक; शहरप्रमुखांचे ‘आमरण उपोषण’ सुरू

ByEditor

Jun 22, 2026
रोहा अष्टमी नगरपालिकेने लादलेल्या वाढीव पाणीपट्टी विरोधात उपोषण दरम्यान घोषणाबाजी करताना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख नितीन वारंगे, शहर प्रमुख राजेश काफरे व अन्य पदाधिकारी व शिवसैनिक. (छाया: शशिकांत मोरे, धाटाव-रोहा)

मुख्याधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ; आंदोलक भूमिकेवर ठाम

धाटाव । शशिकांत मोरे
रोहा-अष्टमी नगरपालिकेने केलेल्या भरमसाठ पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने थेट ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसले आहे. “कमी करा, कमी करा… पाणीपट्टी दरवाढ कमी करा!” अशा जोरदार घोषणाबाजीने आज (सोमवारी) नगरपालिका परिसर दणाणून सोडत शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी असून ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

इतर शहरांच्या तुलनेत रोह्यातच जादा कर का?

नगरपालिका प्रशासनाने या दरवाढीचे समर्थन करताना वीजबिलांमधील वाढ, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल-दुरुस्ती खर्च आणि पाणीपुरवठा विभागाचा तोटा या बाबी पुढे केल्या आहेत. शासनाने सुचवलेल्या वार्षिक ३,६०० रुपयांच्या वाढीऐवजी आपण केवळ २,८०० रुपये दर निश्चित केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.परंतु, शिवसेनेने हा दावा फेटाळून लावत शेजारील शहरांचे दाखले दिले आहेत. महाड (१,१००), श्रीवर्धन (१,२००), मुरुड (१,५००), अलिबाग (८६०), खोपोली (१,३००), कर्जत (१,५००), उरण (२,०००) आणि पेणमध्ये (१,२००) पाणीपट्टी असताना, केवळ रोहेकरांवरच २,८०० रुपयांचा बोजा का? असा संतप्त सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

सकारात्मक चर्चा, पण तोडगा नाही!

आंदोलनाची तीव्रता पाहून पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर आणि मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. यानंतर कै. द. ग. तटकरे सभागृहात पालिका प्रशासन आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. प्रशासनाने पाणी योजनेचा जमा-खर्च अहवाल सादर करत वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीला पालिकेचे उपाध्यक्ष अहमद दर्जी, सभापती रवींद्र चाळके, महेश कोलटकर, नीता हजारे, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, अरबाज मनेर, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे आदी उपस्थित होते. मात्र, दीर्घ चर्चेनंतरही दरवाढ मागे घेण्याबाबत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे शहरप्रमुख राजेश काफरे आणि सहकारी आपल्या आमरण उपोषणावर ठाम राहिले.

विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

शिवसेनेच्या या आंदोलनाला शहरातील इतर सामाजिक व राजकीय स्तरातूनही पाठिंबा मिळत आहे. सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रशांत देशमुख, सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, मिलिंद अष्टीवकर, उस्मानभाई रोहेकर, अमोल देशमुख यांच्यासह शिंदे गटाचे (शिवसेना) प्रकाश कोळी, रोशन पवार, आशिष स्वामी आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

ठाकरे सेनेचे शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख नितीन वारंगे, उपतालुका प्रमुख दुर्गेश नाडकर्णी, सचिन फुलारे, अनिल माळी, चणेरा विभाग प्रमुख मनोज भायतांडेल, धाटाव विभाग प्रमुख सुरेंद्र मोरे, श्रीवर्धन विधानसभा संघटक रमेश विचारे, उपशहर प्रमुख प्रीतम देशमुख, युवासेना शहर अधिकारी ओंकार गुरव यांच्यासह चंद्रकांत कडू, प्रीतम देशमुख, स्नेहल करडे, सागर भगत आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिकेने तोटा भरून काढण्यासाठी लावलेला हा कर आता रोह्यातील मोठ्या राजकीय संघर्षाचे कारण बनला असून, या आंदोलनातून रोहेकरांना दिलासा मिळणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!