पाली : सुधागड तालुक्यातील पाली ते पाच्छापूर मार्गावर धावणारी ‘एसटी’ (राज्य परिवहन) बस रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे बाजूला घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे, परंतु यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाच्छापूरकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलात रुतली आणि एका बाजूला कलंडली. बसचा पुढील भाग रस्त्याखालील खड्ड्यात व चिखलात अडकला. भर पावसात ही दुर्घटना घडल्याने प्रवाशांचे हाल झाले.
घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. चिखलात अडकलेली ही लालपरी बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन ट्रॅक्टर पाचारण करावे लागले. ट्रॅक्टरला दोरखंड बांधून बस बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
या मार्गावरील खड्डे आणि पावसाळ्यात होणारी रस्त्याची दुरवस्था यामुळे सातत्याने असे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
