• Wed. Jul 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावचा नवा पूल धोक्याच्या उंबरठ्यावर! भराव खचल्याने महामार्गाला भेगा, अपघाताची भीती

ByEditor

Jul 1, 2026

ठेकेदारावर कारवाई करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा; माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांची मागणी

सलीम शेख
माणगाव :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातील काळ नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल आणि त्यालगतचा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव खचल्याने महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा आणि खड्डे पडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, येथे केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून पुलाचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (रचनात्मक तपासणी) करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

घाईगडबडीत काम आणि निकृष्ट दर्जाचा आरोप

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलाचे बांधकाम अत्यंत घाईगडबडीत करण्यात आले आहे. भराव करताना आवश्यक त्या तांत्रिक निकषांचे पूर्णपणे उल्लंघन झाले असून, मातीचे योग्य रोलिंग न करणे आणि पाण्याचा पुरेसा मारा न केल्याने भराव सुरुवातीपासूनच कमकुवत राहिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांतच रस्ता खचण्यास सुरुवात झाली. तसेच डांबरीकरणाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे.

दंडाच्या भीतीपोटी सुरक्षिततेचा बळी? मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराला मुदतीत काम पूर्ण न केल्याबद्दल आधीच आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता. हा दंडाचा आकडा आणखी वाढू नये, म्हणून केवळ काम उरकण्याच्या घाईत गुणवत्ता आणि प्रवासी सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

१५५ वर्षांचा जुना पूल आजही भक्कम; नव्या पुलाबाबत प्रश्नचिन्ह!

विशेष म्हणजे, याच काळ नदीवर ब्रिटिश काळात सन १८७१ मध्ये बांधण्यात आलेला जुना पूल तब्बल १५५ वर्षे उलटूनही आजही भक्कम स्थितीत उभा आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेला नवा पूल काही महिन्यांतच धोक्याच्या उंबरठ्यावर आल्याने तंत्रज्ञान आणि भ्रष्टाचारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाहतूक तात्पुरती बंद करण्याची मागणी

मुंबई-गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा दुवा असल्याने या पुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. प्रवाशांच्या जिवाशी खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करावी आणि तज्ज्ञांकडून सुरक्षिततेचा अहवाल आल्यानंतरच ती पुन्हा सुरू करावी, अशी आग्रही मागणी माणगावचे ज्येष्ठ पत्रकार, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

कथित निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण महामार्गावरील नवीन पुलांचे ऑडिट करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!