• Wed. Jul 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बाईकस्वाराला वाचवताना एसटी खड्ड्यात कलंडली; सात प्रवासी सुखरूप

ByEditor

Jul 1, 2026

कार्ले परिसरातील धोकादायक वळणावर अपघात; उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी

गणेश प्रभाळे
दिघी :
म्हसळाहून दिवेआगरमार्गे श्रीवर्धनकडे जाणारी एसटी बस बुधवारी दुपारी कार्ले परिसरातील तीव्र उतारावर एका बाईकस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगतच्या खड्ड्यात कलंडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सातही प्रवासी आणि चालक-वाहक सुखरूप बचावले असून, एक मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा आगाराची ‘एमएच-१३ सीयू-६८९६’ क्रमांकाची बस प्रवाशांना घेऊन श्रीवर्धनकडे निघाली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्ले हद्दीतील तीव्र उतारावर समोर अचानक कुत्र्यांचा घोळका आल्याने एका बाईकस्वाराचे नियंत्रण सुटले. त्याला वाचवण्यासाठी एसटी चालकाने तातडीने ब्रेक लावला. मात्र, पावसामुळे रस्ता निसरडा असल्याने आणि तीव्र उतारामुळे बसचा तोल गेला अन् ती रस्त्याशेजारील खड्ड्यात कलंडली.

स्थानिकांची तातडीने मदत

अपघात होताच कार्ले परिसरातील नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

अपघातांची मालिका थांबवण्याची मागणी

कार्ले परिसरातील हा तीव्र उतार आणि वळण अत्यंत अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) बनले आहे. येथे यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर तातडीने संरक्षक कठडे (क्रॅश बॅरिअर), गतिरोधक आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच पावसाळ्यात वाहनचालकांनी या धोकादायक वळणावर वाहने संथ गतीने चालवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!