• Wed. Jul 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये मुसळधार; अंबा नदीने ओलांडली ‘इशारा पातळी’

ByEditor

Jul 1, 2026

​नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; कुंडलिकाही धोक्याच्या उंबरठ्यावर

​अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या जलस्तरात झपाट्याने वाढ होत आहे. रोहा तालुक्यातील अंबा नदीने (नागोठणे बंधारा) आपली इशारा पातळी ओलांडली असून, यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत जिल्ह्यात अत्यंत तीव्र पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे.

​नद्यांची सद्यस्थिती (बुधवार, सकाळी ९ वाजेपर्यंत)

​रायगड पाटबंधारे विभागाने आज, १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणीपातळी खालीलप्रमाणे आहे:

नदीचे नाव (स्थान)सद्य पाणीपातळी (मीटरमध्ये)इशारा पातळी (मीटरमध्ये)सद्यस्थिती
अंबा नदी (नागोठणे बंधारा)८.५५८.००इशारा पातळी ओलांडली
कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा)२२.६०२३.००इशारा पातळीच्या जवळ
पाताळगंगा नदी (मोहोपे लोहोप)१७.००२०.५०सुरक्षित पातळीत
उल्हास नदी (दहीवली बंधारा)४२.००४८.१०सुरक्षित पातळीत
सावित्री नदी (महाड)२.२०६.००सुरक्षित पातळीत
गाढी नदी (पनवेल)२.०५६.००सुरक्षित पातळीत

कुंडलिका नदी धोक्याच्या छायेत

​रोह्यातील कुंडलिका नदीची पातळी सध्या २२.६० मीटरवर पोहोचली असून ती इशारा पातळीच्या (२३.०० मीटर) अगदी जवळ आहे. त्यामुळे या भागातही पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाडमधील सावित्री, खालापूरची पाताळगंगा, कर्जतची उल्हास आणि पनवेलमधील गाढी नदी सध्या तरी सुरक्षित पातळीवर वाहत आहेत.

​प्रशासनाचे आवाहन
​”अंबा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सतर्क व्हावे. हवामान खात्याचा अंदाज पाहता नागरिकांनी नदीपात्रात उतरणे किंवा पूर पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे. प्रशासनाकडून परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचेच पालन करावे.”
— जिल्हा प्रशासन, रायगड

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!