• Wed. Jul 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड-दापोली मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटी बस घसरल्या; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

ByEditor

Jul 1, 2026

मिलिंद माने
महाड :
तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड आगाराच्या दोन एसटी बसेस रस्त्याशेजारील साईडपट्टीला उतरून एका बाजूला धोकादायक पद्धतीने झुकल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

पावसात चालकांचे वेगावर नियंत्रण सुटल्याचा संताप

महाड-दापोली मार्गावर गेल्या वर्षीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड आगाराच्या बसेसचे अनेक अपघात झाले होते. या वर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. पावसाने रस्ते निसरडे झाले असतानाही एसटी चालक अतिवेगाने गाड्या चालवत असून, त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व प्रवाशांनी केला आहे.

रिमोल्डिंग टायर्स ठरतायत अपघाताला कारणीभूत?

या अपघाताच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे. अनेक एसटी बसेसच्या पाठीमागील बाजूला निकृष्ट दर्जाचे ‘रिमोल्डिंग’ टायर्स वापरले जातात. या टायर्सची नक्षी (ग्रिप) पूर्णपणे झिजलेली असल्याने पावसात ब्रेक लावल्यावर बस थेट घसरत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.

प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात:

“पावसाळी वातावरणात चालकांनी वेगावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. तसेच महामंडळाने झिजलेले टायर्स बदलून गाड्या मार्गावर सोडल्या पाहिजेत, अन्यथा एखाद्या वेळी मोठी दुर्घटना घडू शकते,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!