अलिबाग (विशेष प्रतिनिधी)
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या म्हणजेच गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन ना. जावळे यांनी आज (१ जुलै) सायंकाळी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
या तालुक्यांमध्ये शाळा राहणार बंद
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या ७ तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश
शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात मदत व समन्वय ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
हवामान खात्याने १ जुलै ते ५ जुलै २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार (Extremely Heavy Rainfall) पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
