• Thu. Jul 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा पंचायत समितीत कृषी दिन उत्साहात; प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

ByEditor

Jul 2, 2026

सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे गरजेचे, त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -सभापती विजया पाशिलकर

शशिकांत मोरे
​धाटाव :
हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीच्या वतीने १ जुलै रोजी ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तसेच शेतकऱ्यांना आधुनिक व सेंद्रिय शेतीबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंचायत समितीच्या सभापती विजया पाशिलकर यांनी सेंद्रिय शेतीवर विशेष भर दिला. “सध्याच्या काळात रसायनमुक्त आणि सकस शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्रथम प्राधान्य द्यावे, त्यासाठी पंचायत समिती व प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

​उपसभापती संजय मांडलूस्कर यांनी ‘शेतकरी जगला तर देश जगेल’ असे प्रतिपादन करत, सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच, शासकीय योजना केवळ कागदावर न राहता प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची माहिती दिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

​कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी अधिकारी राखी उपनवर यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत, शेतीकडे ‘उद्योग’ म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यानंतर कृषी तज्ज्ञ जीवन आरेकर यांनी हवामान बदल, एल निनोचा प्रभाव, पाणी व्यवस्थापन, मृदा परीक्षण आणि बाजारपेठ व्यवस्थापन यावर विस्तृत मार्गदर्शन केले. शेतीला पूरक म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय यांसारखे जोडधंदे कसे फायदेशीर ठरतात, यावर त्यांनी प्रकाश टाकला. कृषी विस्तार अधिकारी ऋषिकेश कदम, प्रदीक पावस्कर आणि नेहा पाटील यांनी अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, पशुपालन योजना आणि ‘उमेद’ बचत गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींची माहिती दिली.

​या प्रसंगी तालुक्यातील महादेव सानप, सुदाम रटाटे, अनिल लहाने, भागोजी ढुंमने, श्रीकांत निवाते, प्रदीप दामूगडे, अनंता पाशीलकर, होनाजी हंबीर, ज्ञानेश्वर शेळके, रुपेश साळवी, राजेश शिर्के, एकनाथ वाडकर, गजानन डाकी या प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक व सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

​या कार्यक्रमास गटनेते किसनराव मोरे, जिल्हा परिषद सदस्या निधी जाधव, उर्वशी वाडकर, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, जगन्नाथ धनवडे, समृद्धी कोळी, गटविकास अधिकारी अमृता उंडरे-पाटील, विस्तार अधिकारी दिलीप पाबरेकर, सहा. गटविकास अधिकारी मनोज लाटे, प्रथमेश डाके, दीपक फाउंडेशनचे दीपक ठोसर, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!