कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील अत्यंत महत्त्वाचा आणि मध्यवर्ती केंद्र असलेल्या आंबेवाडी नाक्यावर नुकत्याच बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या भागातील रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून, पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालक आणि प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडत आहे. या दुरावस्थेमुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने व संबंधित ठेकेदाराने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठेतील बायपास रस्त्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्यातच नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाखालील रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यात पाणी साचले आहे. परिणामी, आंबेवाडी बाजारपेठेतून रोहा बाजूस ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना येथून जाताना कमालीची कसरत करावी लागत आहे. वाहनांचा वेग मंदावल्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
७० ते ७२ गावांना फटका, नागरिकांमध्ये संताप
कोलाड-आंबेवाडी हे परिसरातील सुमारे ७० ते ७२ खेडेगावांसाठी मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे दररोज वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची मोठी वर्दळ असते. याशिवाय धाटाव एमआयडीसी, रोहा आणि अलिबागकडे जाणाऱ्या वाहनांचीही या महामार्गावर २४ तास मोठी वाहतूक सुरू असते.
नागरिकांची मागणी:
रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून स्थानिक नागरिक व पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी येथे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.
