वैभव कळस
म्हसळा : गेली १५३ वर्षे म्हसळा येथे श्री राम पेठकर समाजाचा श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा पेठकर समाजाचे तथा शिंपी समाजाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र विष्णू ढवळे यांच्या निवासस्थानी होतो. त्यांचे वडील कै. विष्णू ढवळे हे समाजाचे अनेक वर्षे खजिनदार म्हणून प्रामाणिकपणे काम करीत होते. त्यांच्या वाडवडीलांपासून समाजाची सेवा नित्याने आणि सातत्याने सुरु होती आणि आजही त्यांचे चिरंजीव महेंद्र ढवळे यांनी ही जन्मोत्सवाची परंपरा कायम राखली आहे.
कुंभार समाज गोविंदा पथकाचा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा पूर्वापार समाजाचे म्हेतर गणेश म्हशीलकर यांचे निवासस्थानी साजरा केला जातो. म्हसळ्यात श्री राम पेठकर समाज गोविंदा पथक, कुंभार समाज गोविंदा पथक आणि सोनार कासार गोविंदा पथक असे गोविंदा खेळले जातात. त्यापैकी श्रीराम पेठकर समाज गोविंदा पथक आणि कुंभार समाज गोविंदा पथक या गोविंदा पथकांच्या गोविंदा संपूर्ण शहरभर खेळविल्या जातात. श्री राम पेठकर समाजाची गोविंदा ही ढवळे यांच्या निवासस्थानापासून सुरु होते आणि तिथेच या गोविंदा पथकाचा समारोप होतो.