मुंबईः जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली असून मराठा आरक्षणाच्या संदर्भातने आज एक जीआर निघण्याची शक्यता आहे.
‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मराठा आरक्षणासाठी समिती स्थापन करण्यासंदर्भातला जीआर थोड्यात वेळात निघणार आहे. आज रात्रीपर्यंत हा जीआर निघू शकतो. राज्य शासन समितीमध्ये कोणाचा समावेश करणार आणि समिती आरक्षणाच्या संदर्भाने कोणती कामं करणार, हे स्पष्ट होईल. तिकडे जालन्याच्या अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. परवापासून त्यांनी पाणीही वर्ज्य केलंय. वरचेवर त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. काल गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये गेलं होतं.
गिरीश महाजन यांच्या शिष्टमंडळाने एक महिन्याचा वेळ आंदोलकांकडे मागितला. परंतु जरांगे पाटलांनी चार दिवसाचा वेळ देऊन निर्णय घेण्याची मागणी केली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीतही मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार थोड्याच वेळात मराठा आरक्षणासाठी समिती स्थापन करण्यासंदर्भात जीआर निघू शकतो. सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलेले आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी आग्रही आहे. त्याचीच पडताळणी करण्यासाठी शासन आदेश निघू शकतो.