अनंत नारंगीकर
उरण : सिडको विकसित करत असलेल्या उलवे नोडवासियांना १० वर्षापासून हक्काची स्मशानभुमी नव्हती. अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर, बेलापूर येथे जावे लागत होते. परंतू, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे मागील दोन ते तीन वर्षापासून स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उलवे नोडवासियांना अंत्यविधीसाठी हक्काची स्मशानभूमी मिळाली आहे. नुकताच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उलवेनोड स्मशानभूमीचे लोकार्पण पार पडले.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे नेहमीच गावांच्या विकासासाठी, समाज मंदिरे, रस्ते, गटारे, हायमास्ट अशी लोकपयोगी कामे करत असतात. खारकोपर रस्त्याच्या वेळी अडथळा येणारे घर त्यांनी स्वतःच्या खर्चातून बांधून दिले व रस्त्याला मार्ग मोकळा केला.अशा प्रकारे स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांच्या नंतर समाजासाठी कार्य करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव नेते आहेत अशी प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे. सदर स्मशानभूमीच्या लोकार्पण प्रसंगी मा. उपसरपंच सचिन घरत, ग्रा. सदस्य अरुण कोळी, रोशन म्हात्रे, राकेश घरत, सचिन येरुणकर तसेच आम्ही उलवेकर मित्रमंडळाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या. हक्काची स्मशानभूमी मिळवून दिल्याबद्दल उलवेवासियांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले आहेत.