महेंद्र म्हात्रे
नागोठणे : येथून जवळच असलेल्या पेण तालुक्यातील पाबळ खोऱ्यातील गौळावाडी, पावटावाडी या आदिवासी ठाकुर जमातीच्या वाड्या असून त्यांची लोकसंख्या साधारण १००० ते १२०० पर्यंत आहे. या सर्व लोकांना रोजगारासाठी, नागोठणे, पाली, पेण, रोहा याठिकाणी जावे लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्याना शिक्षणासाठी जाण्यासाठी देखील दररोज गौळवाडी ते जांबोशी असा अडीच किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो.
या वाड्या दुर्गम अशा डोंगराळ भागात असल्याने या वाड्यांवर जाण्यायेण्या साठी अडीच किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. आदिवासी समाजाला आपला शेतमाल, भाजीपाला विकण्यासाठी किंवा आजारी रुग्ण असेल तर गौळावाडी ते जाबांशी असा २.५ किमी चा प्रवास करावा लागतो. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना या वाड्या अजूनही दुर्लक्षित आहेत. रस्त्याअभावी गरोदर महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्यास अडीच किलोमीटर डोली करून न्यावी लागते. त्यामुळे अनेक वेळा वाटेतच महिलेची प्रसूती होते. यामुळे गरोदर महिला आणि नवजात बालकाच्या जीवाला धोका निर्माण होतो.
स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे लोटली तरी येथील आदिवासी समाजाची हि अवस्था आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी या वाड्यांना रस्ता मिळावा अशी विनंती आदिवासी बांधवांकडून केली जात आहे. जांबोशी ते गौळावाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून किंवा अन्य कोणत्याही योजनेतून मंजूर करून बांधण्यांत यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करून ह्या रस्त्यासंदर्भात मागणी करून देखील प्रशासन या मागणीकडे दुर्लक्षच करीत आहे.
